कांजण्या आजार म्हणजे काय व कांजण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार
कांजण्या म्हणजे काय :- कांजण्या हा विषाणूपासून होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. कांजण्या आजारास (चिकनपाॅॅक्स) किंवा व्हॅॅरिसेला या नावानेही ओळखला जातो. कांजण्या आजाराची लागण ही प्रामुख्याने लहान मुलांमध्ये अधिक झालेली आढळते. या आजारात शरीरावर खाज सुटणारे लालसर फोड येत असतात. कांजण्या का व कशामुळे होतात, कांजण्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपचार अशी कांजण्या या रोगाची सर्व माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी या लेखात दिली आहे.
कांजण्या या रोगाची कारणे :- कांजण्या आजार हा व्हारसमुळे होतो. व्हॅॅरिसेला-झोस्टर व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे कांजण्या आजाराचा संसर्ग होत असतो. याशिवाय कांजण्या असलेल्या व्यक्तीकडून याची लागण दुसऱ्याला होऊ शकते. अशाप्रकारे कांजण्या आजार होत असतो.
कांजण्या रोग कसा पसरतो ?
कांजण्या हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत असते. कांजण्याची लागण झालेल्या रुग्णाच्या खोकला, शिंका, लाळ,रुग्णाचे दुषित कपडे किंवा रुग्णाच्या अंगावरील फुटलेल्या फोडातील पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे दुसऱ्या व्यक्तिमध्येही कांजण्याची लागण होऊन हा आजार पसरत असतो.
कांजण्याची लक्षणे
शरीरात व्हायरसची लागण झाल्यापासून लक्षणे दिसण्यासाठी साधारण ७ ते २१ दिवस लागू शकतात. अशावेळी सुरुवातीला खालील लक्षणे चिकनपाॅॅक्समध्ये जाणवू शकतात.
- ताप येणे.
- सर्दी व खोकला होणे.
- डोकेदुखी.
- भूकमंदावणे.
कांजण्यावरील उपचार :-
कांजण्यावर लक्षणानुसार उपचार केले जातात. आपले डॉक्टर ताप आणि खोकला कमी करण्यासाठी औषधे देतील. याशिवाय पूरळावर जंतुनाशक क्रीम लावण्यासाठी देतील. तसेच अंगावरील खाज कमी करण्यासाठी अँटीहिस्टामाइन औषधे किंवा लहान मलम दिले जाते. एक ते दोन आठवड्यात आजार बरा होतो. मात्र काही दिवस कांजण्याचे डाग राहू शकतात.
कांजण्या वर घरगुती उपाय :-
कांजण्यामध्ये फोड आलेल्या ठिकाणी दिवसातून दोनवेळा कडुलिंबाच्या पानांची पेस्ट लावावी. कडुलिंबमध्ये अॅॅन्टीबॅॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे कडुलिंबाच्या घरगुती उपायाने कांजण्यापासून लवकर सुटका होण्यासाठी मदत होते.
कांजण्या रुग्णांनी घ्यायची काळजी :-
- आपल्या डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्यावीत.
- डॉक्टरांनी दिलेली जंतुनाशक क्रीम फोडांवर लावावी.
- त्वचेवरील फोड नखांनी फोडू नयेत.
- रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी.
- इतरांना याची लागण होऊ नये यासाठी काही दिवस कांजण्या झाल्यास मुलांना शाळेला पाठवून देऊ नये.
- मोठ्या व्यक्तींनीही कांजण्या झाल्यास काही दिवस घरीच थांबावे.
- पुरळ डोळ्यांकडे पसरल्यास किंवा अधिक लालसर पुरळ दिसत असल्यास डॉक्टरांकडे जावे.
- तसेच जर चक्कर येणे किंवा श्वास घेण्यासा त्रास होत असल्यासही डॉक्टरांकडे जावे.
कांजण्या झाल्यास काय खावे..?
वरणभात, उसळ, डाळ, दुधाचे पदार्थ, उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग, मांस, मासे यांचा आहारात समावेश करू शकता. सफरचंद, केळी, खरबूज अशी फळे ब्रोकोली, पालक यांसारख्या भाज्याही आहारात असाव्यात. विशेषतः लोह घटक असणारे पदार्थ खाणे कांजण्यामध्ये उपयुक्त असते.
डिहायड्रेशन होऊ नये यासाठी पुरेसे द्रव पदार्थ पिणेही आवश्यक असते. यासाठी पाणी, शहाळ्याचे पाणी, इलेक्ट्रोलाइट पावडरचे पाणी जरूर प्यावे.
कांजण्या झाल्यावर काय खाऊ नये..?
कांजण्यामध्ये केवळ अंगावरच नव्हे तर तोंडाच्या आतसुद्धा फोड येऊ शकतात. अशावेळी जास्त तिखट, खारट, मसालेदार पदार्थ, लसूण खाण्यामुळे तोंडात जास्त त्रास होऊ शकतो. यासाठी तोंडात फोड आलेले असल्यास काही दिवस असे झणझणीत पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
याशिवाय द्राक्षे, अननस, टोमॅॅटो, लिंबूवर्गीय फळे, लोणची, लसूण, जास्त खारट पदार्थ, कॉफी हे पदार्थ कांजण्या झाल्यावर खाऊ नयेत.
कांजण्या होऊ नये यासाठी घ्यायची काळजी :-
- लहान बालकांना आवश्यक त्या लसी वेळेवर द्याव्यात.
- कांजण्या झालेल्या रुग्णाच्या संपर्कात जाणे टाळावे.
- हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
- दुषित हातांचा स्पर्श आपले तोंड, डोळे यांना होणार नाही याची काळजी घ्यावी.
- जन्मल्यापासून वयाच्या पंधरा वर्षापर्यंत कधीही कांजण्या न झालेल्या व्यक्तींनी पुढे कांजण्या आजार होऊ नये यासाठी कांजण्याची लस घ्यावी. मोठेपणी होणारा कांजण्या आजार हा जास्त त्रासदायक असतो.

Comments
Post a Comment