पित्तामुळे डोके दुखत असल्यास हे घरगुती उपाय करा.
पित्तामुळे डोके दुखणे :- पित्तामुळे अनेकांचे डोके दुखत असते. प्रामुख्याने वारंवार तिखट, तेलकट व मसालेदार पदार्थ खाण्याची सवय, बाहेरचे पदार्थ, चहा-कॉफी अतिरेक, अपुरी झोप, तणाव, वेदनाशामक गोळ्यांचा अतिवापर अशा अनेक कारणांनी पित्ताचा त्रास व त्यामुळे डोके दुखू लागते. यासाठी पित्तामुळे डोके दुखणे यावरील घरगुती उपाय याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.
पित्तामुळे डोके दुखण्याची करणे :-
- वरचेवर तिखट, तेलकट, मसालेदार, आंबट, खारट पदार्थ खाण्याची सवय, मांसाहार, लोणची, पापड, आंबवलेले पदार्थ म्हणजे आंबट दही, इडली, डोसा, ब्रेड यांसारखे पदार्थ अधिक खाणे.
- चहा, कॉफीचे अतिप्रमाण.
- उपवास करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे किंवा बराच वेळ उपाशी राहणे.
- तंबाखू, सिगारेट, गुटखा, मद्यपान यांसारखी व्यसने.
- मानसिक तणाव, राग.
- वरचेवर डोके किंवा अंगदुखीच्या वेदनाशामक गोळ्या घेणे.
- अपुरी झोप किंवा अतिजागरण करणे यांमुळे पित्ताचा त्रास प्रामुख्याने होत असतो.
पित्तामुळे डोके दुखणे यावर घरगुती उपाय :-
- पित्तामुळे डोके दुखत असल्यास आल्याचा तुकडा घेऊन तो चांगला चावून खावा.
- वेखंड, सुंठ किंवा दालचिनीची पेस्ट करून ती कपाळावर लावल्यानेही पित्तामुळे डोके दुखणे ही कमी होते.
- पित्तामुळे डोके दुखत असल्यास काही वेळ झोप घ्यावी. यामुळेही आराम मिळून डोके दुखणे थांबते.
- पित्तामुळे डोके दुखत असल्यास पुरेसे पाणी प्यावे. शरीरात पाणी कमी झाल्यामुळे ही अनेकदा डोके दुखते.
- कपाळाला बर्फाचा शेक दिल्यामुळेही पित्तामुळे डोके दुखत असल्यास आराम मिळतो.
पित्तामुळे डोके दुखू नये यासाठी काय करावे...?-
- मसालेदार पदार्थ, तेलकट-तिखट-खारट पदार्थ, फस्टफूड यांसारखे पदार्थ वारंवार खाणे टाळावे.
- चहा-कॉफी वारंवार पिणे टाळावे.
- संतुलित आहार घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश करा.
- वेळेवर जेवण घ्या. अधिक वेळ उपाशी राहू नका. दिवसभरात पुरेसे पाणी म्हणजे किमान ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे.
- दररोज सकाळी उठल्यावर उपाशीपोटी तांब्याच्या भांड्यातील ग्लासभर पाणी प्यावे.
- स्मार्टफोन, कम्प्यूटर, टीव्हीसमोर सतत बसू नका.
- जागरण करणे टाळा. दररोज किमान ६ ते ७ तासांची झोप आवश्यक असते. पुरेशी झोप घ्यावी.
- नियमित व्यायाम करावा. मोकळ्या हवेत फिरायला जावे.
- मानसिक ताणताणाव, चिंता यांपासून दूर रहा. मनशांत ठेवण्यासाठी योगा, प्राणायम, ध्यानधारणा करावी.
- तंबाखू, गुटखा, सिगारेट, विडीचे व्यसन करणे टाळा.
- वारंवार डोके दुखत असल्यास उठसुठ वेदनाशामक गोळ्या घेणे टाळा.

Comments
Post a Comment