उन्हाळा सुरु झाला कि काही आजार व विकार हळूहळू डोके वार काढू लागतात. सनस्ट्रोक होणे, अंगाची लाहीलाही होणे, गरमीमुळे जीव घाबरून येणे, त्वचारोग होणे, घामोळे येणे, उष्माघात होणे असे उन्हाशी संलग्न असलेले आजार मोठ्या प्रकर्षाने जाणवू लागतात.दरवर्षी उन्हाळ्याच्या त्रासामुळे तसेच उष्माघातामुळे अनेक बळी जाण्याच्या बातम्या देखील आपण कायम वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या माध्यमातून पाहत असतो. चालता - चालता चक्कर येवून उष्माघाताच बळी गेलेली अनेक उदाहरणे आपण ऐकली व अनुभवली असतील.
उन्हाळा व उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?
उष्माघातापासून संरक्षण कसे करता यावे याकरता काही उपाययोजना करता येवू शकता का तसेच उन्हाळ्यामुळे होणारे आजार कसे रोखता येतील याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. उन्हापासून वाचण्याकरता काय करावे हे पण या लेखात आपण जाणून घेवु.
उन्हाळा सुरु झाला कि रस्त्यावर जागोजागी आपल्याला कलिंगडाचे मोठमोठे ढिगच्या ढिग विक्रीस आलेली दिसतात. कलिंगड, टरबुज, खरबुज हे उन्हाळ्यातील पाण्याचे झरे म्हणावे तरी वेगळे ठरणार नाही. ही फळे ९०% पाण्याने रसरशीत असतात. उन्हाळ्यात ही फळे आपल्या शरीराला आवश्यक पाणी देतात व हायड्रेट राहण्यास मदत करतात. याकरता आवर्जुन ही फळे उन्हाळ्यात खात जा.
उन वाढते तसे आपले पाय चौकाचौकात थाटलेल्या उसाच्या रसाच्या दुकानांकडे वळू लागतात. उसाचा रस हा उन्हापासून आपले रक्षण करतोच शिवाय अंगाची लाहीलही थांबवतो. मात्र उसाचा रस बर्फ टाकून कधीही पिऊ नये. उन्हाळ्यात बाहेर कामानिमित्त जावे लागत असेल तर रस्त्याने उसाचा रस प्यायल्यास एनर्जी व थंडावा दोन्ही मिळतो.
उन्हाळा सुरु झाला कि आपल्या आजूबाजूचा परिसर व वातावरण सर्वच जास्त तापमान वाढीमुळे भकास वाटू लागते. ग्रामीण भागामध्ये झाडाखाली बसणाऱ्यांची गर्दी वाढू लागते. अनेक ठिकाणी चिंचेचे, आंब्याचे, वडाचे,पिंपळाचे पार बनवलेले असतात जे उन्हाळ्यात जास्त गजबजू लागतात. गर्द व दाट सावली देणारी झाड हे निसर्गाने दिलेले वरदानच आहे. एखाद्या गाळणी सारखी उष्णता गाळुन झाड आपल्याला थंडावा देते. उन्हाचा त्रास जाणवत असेल तर झाडाखाली काही वेळ बसावे, पाणी प्यावे नंतर पुढे जावे. झाडाखाली थंड हवेसोबत
आल्हाददायी वातावरण असते जे जीवाची तगमग थांबवते.
उन्हाळ्यामध्ये जे कपडे आपण वापरतो ते वापरताना काही खबरदारी घ्यावी. उन्हाळ्यामध्ये शक्यतो पांढरे किंवा फिकट रंगाचेच कपडे परिधान करावे, ज्यामुळे आपल्याला सूर्याच्या उष्णतेपासून त्रास होत नाही. योग्य सैल सुती व उष्णता रोधक रंगाचे कपडे वापरल्याने घामाची निर्मिती देखील योग्य प्रमाणात होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गडद रंगाचे कपडे घालणे टाळावे.शक्य असेल तर केवळ पांढरे सुती कपडे परिधान करावे.
सुर्याच्या उष्णतेमुळे आपल्या शरीरातील पाणी देखील बाष्प होऊन संपून जाते. यामुळेच उन्हाळ्यामध्ये जास्त तहान लागते व घसा कोरडा होतो तसेच उन्हाळी लागते ज्यामुळे वारंवार लघवीला लागते.याकरता आपल्या सोबत नेहमी जास्तीचे पाणी सोबतच ठेवावे. उन्हाळ्यात जागोजागी पाणपोई लागलेली असते, ज्यामध्ये माठांंमध्ये पाणी भरून ठेवलेले असते. नियमित साफ होणाऱ्या पाणपोईमधील पाणीच प्यावे.
उन्हाळ्याचा दिवसात उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून शक्यतोवर काम नसताना उन्हामध्ये हिंडू फिरू नये. घराबाहेर पडताना व पायी चालत असाल तर डोक्यावर छत्री घेऊन चालावे. छत्री देखील चांगल्या फिकट रंगाची वापरावी. काळ्या रंगाच्या छत्री वापरू नये.
लिंबू सरबत उन्हाळ्याच्या दिवसात शरीरासाठी अगदी अमृत म्हणावे असे आहे. आंबट फळे व ज्युस उष्णतेपासून बचाव करतात. लिंबू क जीवनसत्वयुक्त असते. लिंबामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे गुणधर्म असतात तसेच लिंबू पाणी प्यायल्यामुळे इंस्टेट उर्जा निर्माण होते व उन्हाळ्याच्या तडाख्यापासून आपले संरक्षण होते. याकरता उन्हाळ्यात लिंबूपाणी अवश्य घ्यावे.
Comments
Post a Comment