ओटीपोटात सूज
- Get link
- X
- Other Apps
ओटीपोटात सूज
ओटीपोटात सूज
स्त्रियांच्या बाबतीत ओटीपोट म्हणजे गर्भाशय,गर्भनलिका, स्त्रीबीजांडे व आजूबाजूचा भाग (स्नायू,इत्यादी). ओटीपोटात सूज हा तसा दुर्लक्षित आजार आहे. आपल्या देशात स्त्रियांसाठी चांगल्या वैद्यकीय सेवा नसणे हे त्याचे एक प्रमुख कारण आहे. या आजारांमध्ये आकस्मिक म्हणजे नवे जंतुदोष आणि जुने जंतुदोष असे दोन गट पाडता येतील. पहिल्या प्रकारात नीट उपचार न झाल्याने दुसरा प्रकार उद्भवतो.कारणे
ओटीपोटात सूज येण्याचे मुख्य कारण म्हणजे जंतुदोष.
या जंतुदोषाची अनेक कारणे आहेत ती अशी : बाळंतपण किंवा गर्भपाताच्या वेळी जंतुदोष होणे : बाळंतपणापेक्षा गर्भपात हे महत्त्वाचे कारण आहे, विशेषतः चोरूनमारून केलेले सदोष गर्भपात जंतुदोषास हमखास आमंत्रण देतात. पण वैद्यकीय गर्भपातातही जंतुदोषाचा थोडा धोका असतोच. (म्हणूनच गर्भपातापेक्षा संतती प्रतिबंधक जास्त चांगले.) ओटीपोटावरच्या शस्त्रक्रिया : सिझेरियनची शस्त्रक्रिया, स्त्रीनसबंदी, गर्भाशय काढून टाकणे, इत्यादी. लिंगसांसर्गिक आजार : परमा (गोनोरिया) व इतर जंतुदोष. क्षयरोग : (इतर अवयवांतून आलेला क्षयरोग) तांबी, लूप, इत्यादी वस्तूंमुळे होणारा जंतुदोष : या वस्तूंच्या गर्भाशयातल्या सतत अस्तित्वाने काही स्त्रियांना सौम्य जंतुदोष होऊ शकतो. इतर काही प्रकारचे जंतुदोष : यातील अनेकांची कारणे माहीत नाहीत.
लक्षणे, चिन्हे व रोगनिदान
या आजाराचे मुख्य दोन प्रकार पाडता येतील: तीव्र आकस्मिक किंवा नवा जंतुदोष (दाह) व दीर्घ म्हणजे जुना जंतुदोष (दाह): आकस्मिक तीव्र जंतुदोष दाह (नवी सूज) हा प्रकार बहुधा बाळंतपण, गर्भपात, शस्त्रक्रिया, लिंगसांसर्गिक आजार या घटनांनंतर येतो. यात अचानक ताप, ओटीपोटात खूप वेदना, दुखरेपणा ही मुख्य लक्षणे असतात. हा प्रकार अगदी त्रासदायक आणि गंभीर असतो.
यासाठी वेळीच तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक असते. रुग्णालयातच यावरचे उपचार करता येतील. अर्धवट उपचार झाल्यास जंतुदोष ओटीपोटात टिकून राहतो. यातून खाली दिलेला दुसरा प्रकार संभवतो. ओटीपोटात दीर्घ दाह (जुनी सूज) ह्या आजाराची लक्षणे सौम्य स्वरूपाची असतात. ओटीपोटात मंद दुखते, दुखरेपणा,म्हणजे आतून तपासताना किंवा लैंगिक संबंधाच्या वेळी दुखते. याबरोबरच, पाळीच्या वेळी दुखणे, कंबरदुखी, अशक्तपणा, बारीक ताप, अंगावरून पाणी जाणे (कधी यास दुर्गंधी असते.), इत्यादी लक्षणे आढळतात.
वर सांगितल्याप्रमाणे हा प्रकार बहुधा तीव्र जंतुदोषातून सुरु होतो. पण काही वेळा याची सुरुवात नकळत होते. क्षयरोग हेही याचे एक कारण आहे. हा संथपणे चालणारा आजार आहे. आतून तपासताना किंवा लैंगिक संबंधात दुखरेपणा ही ओटीपोटात सूज असल्याची नक्की खूण आहे. ओटीपोटात सूज आहे ही शंका घेऊन वेळीच तज्ज्ञाकडे पाठवणे फार महत्त्वाचे आहे.
दुष्परिणाम
सतत दुखरेपणा असणे हा मुख्य त्रास असतो. यामुळे लैंगिक संबंध त्रासदायक होतो. त्याचबरोबर वंध्यत्व व अस्थानी गर्भ राहणे हे महत्त्वाचे दुष्परिणाम आहेत. गर्भनलिका सुजून बंद झाल्यामुळे वंध्यत्व येते. गर्भनलिका अंशतः बंद झाल्यास स्त्रीबीज गर्भनलिकेत अडकून पडते व अस्थानी गर्भ राहतो. हे दोन्ही दुष्परिणाम गंभीर आहेत.
उपचार व प्रतिबंध
ओटीपोटात सूज असण्याचे प्रमाण व त्याचे दुष्परिणाम पाहून वेळीच रोगनिदान करणे महत्त्वाचे आहे.बाळंतरोग
, दूषित गर्भपात व लिंगसांसर्गिक आजारांचा प्रतिबंध केल्यास ओटीपोटात सूज येण्याचे प्रमाण खूप कमी होईल. यासाठी चांगल्या वैद्यकीय सेवा सर्वत्र उपलब्ध होणे आवश्यक आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment