स्त्री आरोग्य गरज समुपदेशनाची अन् व्यायामाची
- Get link
- X
- Other Apps
स्त्री आरोग्य गरज समुपदेशनाची अन् व्यायामाची
नांदेड येथे स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत असणार्या डॉ.वृषाली किन्हाळकर यांनी याविषयावर विपुल लेखनही केलं आहे.मराठवाड्यातील स्त्रियांच्या आरोग्याबाबत, विशेषतः त्यांच्या मानसिक आरोग्याबाबत त्यांची ही काही परखड निरीक्षणं.
गेल्या तीन वर्षात स्त्रियांच्या आरोग्य समस्यांशी निगडीत राहणे हा माझ्या व्यवसायाचाच भाग होता. पण व्यवसाय हेच केवळ त्याचे स्वरूप न उरता तो माझ्या चिंतनाचा, चिंतेचा आणि आस्थेचा विषय बनत गेला आणि मग आपसूकपणे तो विषय वेगवेगळ्या स्वरुपात, वेगवेगळ्या मांडणीने मी कागदावरदेखील उतरवत गेले.
शरीराच्या समस्यांइतकाच त्यांच्या मनातील गुंतेदेखील माझ्या जिव्हाळ्याचे विषय झाले. आज प्रकर्षाने एक गोष्ट जाणवतेय ती अशी की बाईचे जगणे आता बरेच सुखावह झालेय. वारंवार आणि नकोशा गर्भारपणाचे ओझे तिच्यावर लादणे आता खूप कमी झालेय. बाळंतपण घरीच करावे असा समजदेखील समाजमनातून पुसला जात आहे. खेड्यात वाडी-अंगणवाडीत जाणे, प्रसूतीचे कार्ड घेणे, धनुर्वाताची लस टोचून घेणे, तांबी बसवून घेणे, गर्भनिरोधक गोळ्या खाणे या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या गेल्या आहेत. त्यामुळे रात्री-अडलेली बाई खेड्यातून येण्याचे प्रमाण पुष्कळच कमी झालेय. अवघड बाळंतपणात मूल पोटातच दगावले अशा गोष्टी खूपच कमी झाल्या आहेत.
सिझेरीयन ही शस्त्रक्रिया दुर्मिळ उरली नाही. किंबहूना सिझेरीयन झालेच नाही एकाही बाईचे असे घर सापडणे मुश्कील झालेय. हळूहळू का होईना, सिझेरीयन ही शस्त्रक्रिया बाईसाठी वरदानच आहे हे समजू लागलेय सर्वांना. कुटुंबातील अपत्यसंख्यादेखील मर्यादित आहे घरोघरी. जिला दोन मुली झाल्या तिला तिसरे बाळंतपण अनिवार्य असते ते मुलगा हवाच म्हणून. अन्यथा दोन मुलगे झाले की पटकन तिची ‘कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया’ उरकली जातेय.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुटुंब नियोजन, लोकसंख्या नियंत्रण या योजना राबवल्या गेल्या.आज एकविसाव्या शतकात त्या योजनांचे स्पष्ट स्वरूपातील परिणाम दिसून येत आहेत. स्त्रीमुक्तीची चळवळ किंवा लाट १९७५ पासून दृष्टीस येऊ लागली. बाईला स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागली. शिक्षणाच्या सवलती अन् अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध झाल्या. हळूहळू मराठवाड्यातील बाईदेखील थोडा कुठे मोकळा श्वास घेऊ लागली. साधारण १९९०-च्या आसपास. पण मग अचानक सोनोग्राफी मशीन्स आली. वंध्यत्व आणि व्यंग असणारी मुले या समस्येतून बाईला सोडविण्यासाठी हे तंत्र फार प्रभावी आहे. परंतु दुर्दैवाने या तंत्राचा उपयोग प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदानासाठीच प्रचंड प्रमाणात झाला अन् तमाम स्त्रियांनीच स्वत: माणूसपणाच्या प्रगतीच्या वाटेवर लाजिरवाणे प्रकार करून स्त्री-पुरुष समतेच्या चळवळीला पुन्हा मागे नेऊन ठेवले.
शिकलेली, आत्मनिर्भर, स्वतंत्र स्त्रीदेखील दुसर्या मुलीच्या जन्माला घाबरू लागली. ‘दुसरी मुलगी नकोच’ या हट्टाला मग डॉक्टरबाई तिचा अनुनय करून स्वत:अर्थकारण करू लागली अन् परिणामी पुरोगामी महाराष्ट्रात लाखो मुली गर्भातूनच नष्ट केल्या गेल्या. शिकलेली, आत्मनिर्भर परंतु भित्री व्यवहारी बाई घरोघरी दिसू लागली आणि माझ्या आतली डॉक्टरबाई प्रचंड व्यथित झाली. मी खूप अस्वस्थ झाले आणि ममुलगा हवाचफ या अट्टाहासाला स्त्रीपुरुषांच्या मनातून उपटून काढण्याचा माझ्या कृतीभवाणी-अथक प्रयत्न करीत राहिले. परिणाम आशादायी नव्हतेच पण मी थकले नाही. जे समुपदेशनाने झाले नाही, त्यासाठी शासनाने कडक भूमिका घेतली. तरी खूप ठिकाणी डॉक्टर्स-पेशंट्स यांच्या गुपचूप संगनमताने मुली मारल्या गेल्याच.
जनगणनेने सगळे कुरुप सत्य पुढे आले. आज हे प्रमाण थोडे कमी झालेय, पण माझे सलणारे दु:ख हे आहे की डॉक्टरांसारख्या उच्चविद्याविभूषित समूहाला दंड, तुरुंगवास यांची भीती दाखवून वठणीवर आणावे लागले! असो. यापलीकडे स्त्रीच्या आरोग्याबाबत बोलायचे झाले तर सिझेरीयनचे वाढते प्रमाण ही एक वस्तुस्थिती आहे. परंतु मर्यादित अपत्यसंख्या ठेवणार्या आजच्या प्रत्येक कुटुंबाची रास्त अपेक्षा असते की मूल सुखरूप सुदृढ असावे. या कारणामुळे बाळंतपणाच्या सुरक्षिततेवर जास्त भर दिला जातो. माता व बालक दोन्ही सुरक्षित ठेवणे हे डॉक्टरांचे कर्तव्य आहे.या कारणास्तव सिझेरीयनची संख्या वाढत जाते. काही वेळा अनावश्यक सिझेरीयन केले हे आरोप होतात. पण या प्रश्नाला दोन बाजू आहेत अन् सीमारेषा पुसट आहे.
हल्ली pregnancy loss खूप वाढला आहे.दोन/महिन्याचा गर्भपात होणे हे प्रमाण गावोगावी दिसतेय. विषाणू संसर्गामुळे हे घडते. यासाठी लसीकरण व थोडा काळ (महिने) गर्भाशयास विश्रांती देणे गरजेचे असते. स्त्रियांना मासिक पाळीत त्रास होण्याचे प्रमाणदेखील वाढलेय. खूप स्त्रियांची गर्भाशये काढून टाकण्याची शस्त्रक्रिया चाळिशीपूर्वीच होतेय. स्त्रियांचा ताण वाढला आहे आणि ताण घेण्याची प्रवृत्तीसुद्धा वाढीस लागली आहे. कॅन्सरचा धोका वाढला आहे, तितकीच भीतीदेखील वाढली आहे. डॉक्टर्सदेखील ही भीती वाढवतात व खूपदा अनावश्यक शस्त्रक्रिया होतात हे सत्य आहे.
गांभीर्याने घेण्याची एक गोष्ट म्हणजे स्तनांचा कर्करोग. प्रत्येक स्त्रीने स्वत:स्तनांची तपासणी करणे शिकून घ्यावे. नियमितपणे ती करावी व गाठ जाणवली तर डॉक्टरांकडे जावे. हे खरे गरजेचे आहे. मला मनापासून वाटतं की आजच्या स्त्रीला गरज आहे ती नियमित शारीरिक व्यायामाची, योग्य संतुलित आहाराची, तणावरहित जगण्याची आणि समुपदेशनाची. मिळालेलं स्वातंत्र्य योग्य तर्हेने उपभोगणे तिला पेलता येत नाहीये असे माझे स्पष्ट मत झालेय. रोज मी असंख्य स्त्रिया तपासते, पाहते, अनुभवते. मनाची प्रगल्भता फार दुर्मिळ झालीय. खूप आत्मकेंद्री होतेय स्त्री. तिच्या अनेक शारीरिक तक्रारींच्या मुळाशी मानसिक असमाधान असते.
तरुण मुली फार अयोग्य आहार घेतात. झीरो फिगर वगैरे त्यांच्या डोक्यात असते. पण तरुण मुलींना संयम मात्र जरा कमीच आहे हे जाणवतं. एकूणातच मागच्या दहा वर्षात स्त्रीला फारसे रोग होतात असं काही दिसत नाही; पण ती नको तितकी health conscious होण्याच्या नावाखाली स्वत: अनारोग्याकडे नेतेय असं वाटतं. Perfectionist होण्याचे देखील खूळ असते. बालाजी तांबेंच्या पुस्तकाप्रमाणे सगळी औषधं घ्यायची अन् पुन्हा डॉक्टरांचीही औषधं घ्यायची, Amway ची उत्पादनेही खायची असा अतिरेकदेखील दिसतो. इतकं सगळं करायचं, गूगलवरून सगळं वाचायचं, पण तरीही प्रचंड मानसिक ताण असतोच. सगळं कुठेतरी चुकत चाललं आहे असं वाटतं.
सरतेशेवटी मी इतकंच म्हणेन की बाई स्वनिर्मित मानसिक तणावाखाली जगतेय. ‘सहज’ जगणं दूर राहिलं आहे. शरीराचे रोग नाहीत असं नाही पण प्रभावी इलाज आहेत त्यामुळे चिंता नाही.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment