योनिदाह

योनिदाह


योनिदाह म्हणजे योनिमार्गाच्या आतल्या नाजूक त्वचेचा दाह. योनिदाहाची कारणे अनेक आहेत. सर्वात महत्त्वाचे आणि जास्त आढळणारे प्रकार म्हणजे बुरशी, जिवाणू आणि ट्रायकोमोनास (एकपेशीय जीव) यामुळे होणारे योनिदाह. योनिमार्गात काही जैवरासायनिक कारणांमुळे सतत आम्लता असते. या आम्लतेमुळे योनिमार्गात सहसा इतर जंतू वाढू शकत नाहीत. एका विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्मजंतूंच्या (लॅक्टोबॅसिलस) कायमच्या वस्तीमुळे अशी आम्लता राहते. गरोदरपण, बाळंतपणानंतरचा काही काळ, पाळी कायमची थांबल्यानंतरचा काळ हे कमी आम्लतेचे असतात. म्हणून या तीन काळात जंतुदोष होऊ शकतो. बुरशी, जिवाणू आणि ट्रायकोमोनास शिवाय आणखी काही जंतू विशिष्ट परिस्थितीत योनिमार्गात वाढू शकतात. परमा (गोनोरिया) या लिंगसांसर्गिक रोगजंतूमुळे कधीकधी योनिदाह होऊ शकतो. गर्भाशयाचा कर्करोग, ओटीपोटाच्या शस्त्रक्रिया,मधुमेह, इत्यादी कारणांनी इतर जंतुदोष होऊ शकतात. 

रोगनिदान

शक्यतो या दाहाचे नेमके कारण व प्रकार ओळखणे आवश्यक असते. कुस्को योनिदर्शकाच्या तपासणीत हा स्राव दिसून येतो. योनिदर्शकाच्या चमच्यासारख्या भागावरही हा स्राव आपोआप येतो, तो तपासावा. अंगावरून पाणी जाणे (प्रदर) व खाज सुटणे ही योनिदाहाची प्रमुख लक्षणे आहेत. याला कधीकधी दुर्गंधी (विशेषतः ट्रायकोमोनास प्रकारात) येते. आतून तपासणी केल्यावर योनिदाहाचा प्रकार समजू शकतो. बुरशीजन्य योनिदाहात दह्यासारखा चिकट जाड स्राव येतो व आतली त्वचा सरसकट लालसर दिसते. ट्रायकोमोनास प्रकारात हा स्राव हिरवट-पिवळट, दुर्गंधीयुक्त, फेसकट असतो व खाजही भरपूर असते. यात आतल्या त्वचेवर बहुधा मोहरीइतके लालसर रक्ताळलेले ठिपके असतात. कधी कधी लघवीस जळजळ होते. या योनिदाहाबरोबर (ट्रायकामोनास) इतर जंतुदोषही आढळण्याची शक्यता असते. याशिवाय इतर प्रकारचे जंतुदोष म्हणजे शरीरात इतर ठिकाणी 'पू' निर्माण करणारे किंवा अन्नमार्गातील जिवाणू असतील तर ओळखणे जरा अवघड जाते. अशा प्रकारचे इतर'जंतुदोष' बाळंतपणानंतर किंवा
जखमांबरोबर येतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंगावरून पांढरे-पिवळे स्राव जाण्याची तक्रार असेल तर आतून तपासणी केल्याशिवाय निष्कर्ष काढू नये. स्राव/पाझर जाण्यामागे योनिदाह सोडून इतरही कारणे असतात, उदा. गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग, गर्भनलिकांचे जंतुदोष, इ. अंगावरून स्राव म्हणजे योनिदाह असे समीकरण करणे चुकीचे आहे. गरज वाटल्यास डॉक्टरकडे पाठवून निश्चित निदान करता येईल. 

उपचार

योनिदाहाचा प्रकार ठरवून उपचार करावेत योनिदाह बुरशीजन्य किंवा अन्य जंतुदोषांमुळे असेल तर जेंशन (व्हायोलेट) औषध बोळयाने आतून आठवडाभर दिवसाआड लावल्यास आराम पडतो. मात्र जेंशन हे सौम्य औषध आहे. ट्रायकोमोनास हे कारण असेल तर पोटातून .मेझोलच्या गोळया (1000 मि. ग्रॅ. डोस फक्त 1 दिवस ) घेणे हाच चांगला उपाय आहे. हा प्रकार फक्त औषध लावून बरा होत नाही. पण इतरही जंतुदोष असतात म्हणून जेंशन औषध लावणे हे योग्य ठरेल. दोन्ही प्रकारांत आतून लावण्यासाठी प्रोव्हिडोन आयोडिन हे औषध काही प्रमाणात उपयोगी ठरते. घरगुती उपचार: योनिधावन करून योनिमार्गात थोडे वर लसणाची पाकळी ठेवल्यास (रोज 2-3 दिवस) बुरशीदाह बरा होतो. लसणाऐवजी आठवडाभर रोज दही आतून लावण्यानेही आराम पडतो. ट्रायकामोनास योनिदाह असल्यास योनिधावन करून, कडुनिंब पाला कुटून त्याची ओली पुरचुंडी (स्वच्छ कापडात) रात्री योनिमार्गात थोडी वर ठेवावी. दुस-या दिवशी सकाळी पुरचुंडी बदलावी. याने लवकर आराम पडतो. योनिदाह वारंवार होत असल्यास लघवीची साखरेसाठी तपासणी करून मधुमेहाची शक्यता तपासली पाहिजे. इतर काहीही त्रास, ओटीपोटात गाठ दुखरेपणा असल्यास तज्ज्ञाकडे पाठवावे. ट्रायकोमोनास, बुरशी यांमुळे होणारा योनिदाह लिंगसांसर्गिक असल्याने जोडीदाराची तपासणी व उपचार होणे आवश्यक असते. नाहीतर आजार जोडीदारांमध्ये फिरत राहील.

Comments

Popular posts from this blog

Monday to Sunday! These 7 Healthy Detox Waters By Day Will Keep You Healthy English helth Tips

LDL Cholesterol Reducing Tips : This blue tea will help remove the dirt accumulated in the veins, Natural and Home Remedies for LDL Cholesterol English helth Tips

ठंडे पानी के स्वास्थ्य लाभ Hindi Helth Tips